इंदापूर: प्रतिनिधी
कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊंचा विचार हे आजच्या पिढीला प्रेरणादायी असून भाऊंनी इंदापूर तालुक्यात ज्या संस्था उभारल्या तसेच गावोगावी ग्रामपंचायती, सोसायट्या उभारणीसाठी तब्बल 65 वर्षाहून अधिक ते चंदनासारखे झिजून त्यांनी तालुक्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. त्यांचे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 14 व्या पुण्यस्मरणानिमित्त बिजवडी (ता. इंदापूर )येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री पाटील बोलत होते.
यावेळी भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार व प्रतिमेस चे पूजन व धार्मिक कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
माजी मंत्री पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी भाऊंनी तालुक्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यांना आपल्यातून जाऊन 14 वर्षे झाली तरी त्यांचे विचार अजरामर ठरले आहेत. त्यांच्या विचारानेच आपण पुढे जात आहोत . कारखान्याने यंदा गळीत हंगामात 14 लाख टनांचे उद्दिष्ट ठेवले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच सातत्याने काम करणे गरजेचे आहे. संपूर्ण कारखान्याची गळीत हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आली असून 25 सप्टेंबरला बॉयलर प्रतीपदन होणार आहे. कारखान्याच्या परिसरात पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने तब्बल साडेपाच हजार झाडे लावून त्याचे उत्तम रित्या संगोपन करण्यात आलेले आहे .पुढील दोन वर्षात कर्मयोगी कारखाना हा ग्रीन शुगर इंडस्ट्रीज म्हणून नावारूपाला येणार आहे . सेंद्रिय खत कंपोस्ट खत ,बायोगॅस, आसावरी प्रकल्प, सीएनजी गॅस, इथेनॉल प्रकल्प हे साखर उत्पादनाबरोबरच इतर उत्पादने ही करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत साखर कारखानदारीवरती आर्थिक ताण असला तरी यंदा विक्रमी गाळप करण्याकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील जनतेने आपल्या कामाबरोबरच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून या कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजार पिटाळून लावण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही पाटील यांनी शेवटी केले.
कारखान्याच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी भाऊंना अभिवादन करून त्यांच्या कार्याची महती सांगून त्यांचे विचार आत्मसात करावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा , वसंत मोहोळकर ,सुभाष काळे, राजेंद्र गायकवाड, भास्कर गुरगुडे, अंबादास शिंगाडे, हनुमंत जाधव, पांडुरंग गलांडे, मच्छिंद्र अभंग, केशव दुर्गे , माजी उपाध्यक्ष भागवत गटकुळ यांच्यासह कर्मचारी सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले .
टिप्पण्या