इंदापुर तालुक्यातील प्रत्येक गावात भाजपाच्या वतीने शनिवारी दुध दरवाढीचे आंदोलन-मा.ना. हर्षवर्धन पाटील
लॉकडाउनचा फटका बसलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांची अद्यापी राज्य सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही.त्यामुळे राज्य शासनाने गाईच्या दुधास प्रतिलिटर रू. 30 दर द्यावा या प्रमुख मागणीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तालुक्यात इंदापूरसह सकाळी 11 वाजता गावोगावी भाजपच्या वतीने शनिवारी (दि.1 ऑगस्ट) दूध दरवाढीचे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.30) दिली.
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने राज्य सरकारला शेतकऱ्यांकडील सर्व दुधाची खरेदी करण्यात यावी, अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी तयार करावी, दुधास प्रतिलिटर 10 रू.अनुदान द्यावे आदी मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र या मागण्या राज्य शासनाने मान्य न केल्याने भाजप आपल्या महायुतीतील रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप आणि शिवसंग्राम या मित्र पक्षांसह शनिवारी (दि.1) राज्यभर आंदोलन करून राज्य सरकारला दूध दरवाढीचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले,भाजपच्या वतीने दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 21 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. त्या दिवशी इंदापूर येथेही आंदोलन करून दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आले होते.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून खरेदी थांबली आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर रु.17 ते 19 एवढा दर दिला जात असल्याने दुधाचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी स्थिती आहे. अशाप्रकारे राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे भाजपतर्फे इंदापूर येथे आंदोलन होणार असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाजप न्याय मिळवून देईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
____________________________
टिप्पण्या