इंदापुर: राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.14) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावला भेट देऊन तेथे ऊस पिकावर सुरू असलेल्या विविध संशोधनांची, नवीन वाणांची व आधुनिक पीक पद्धतीची माहिती घेतली.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात शुद्ध अनुवंशिकता असलेले प्रमाणित दर्जाचे विविध वाणांचे ऊस बेणे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पाडेगाव संशोधन केंद्र येथून ऊस पिकाचे मूलभूत( ब्रीडर) बियाणे हे पायाभूत बीजोत्पादनासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी- महात्मा फुलेनगर व निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या दोन्ही कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांना देण्याचे येणार आहे. पायाभूत बेण्यांपासून तयार झालेले शुद्ध गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे हे ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुद्ध गुणवत्तेचे बेणे वापरल्याने उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांचा चांगला आर्थिक फायदा होणार आहे,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या भेटीप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी एम.एस.10001,को. 86032, फुले 0265 तसेच चाचणी सुरू असलेल्या को.9057 या वाणांच्या उस प्रक्षेत्रांना भेटी देऊन संशोधनाची माहिती घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार ऊस विशेष तज्ञ डॉ. भरत रासकर यांनी केला.याप्रसंगी कार्यालयामध्ये ऊस पिकावरील संशोधन व नवीन वाण यासंदर्भातील उत्कृष्ट सादरीकरण डॉ. भरत रासकर यांचेसह डॉ. सुभाष घोडके, कृषी विद्यावेत्ता डॉ. तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे समोर केले.
या भेटीच्या वेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, राजेंद्र कोरटकर, कर्मयोगी कारखान्याचे शेतकी अधिकारी एस.जी.कदम, ऊस पुरवठा अधिकारी जी.के.पोळ, नीरा-भीमा कारखान्याचे ऊस विकास अधिकारी डी.एम. लिंबोरे आदी उपस्थित होते.
फोटो- माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास भेट देऊन,ऊस पिकावरील संशोधनाचे माहिती घेतली.
टिप्पण्या