इंदापूरः तालुक्यातील गणेशवाडी-बावडा येथे कोरोनाचा 52 वर्षीय रुग्ण आढळून आला आहे. या व्यक्तीचा स्वॅब तपासणी अहवाल आज शनिवार (दि.27) सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी येथे भेट देऊन प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली.
दरम्यान,यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत बावडा गाव हे उद्या रविवार, सोमवार,मंगळवार असे एकूण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गणेशवाडी येथे 7 दिवस बंद पाळण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कोरोनाची लागण झालेली व्यक्ती औरंगाबाद येथील एका कंपनीमध्ये कामाला आहे. सदरची व्यक्ती गणेशवाडी येथे दि.23 रोजी आली. त्यानंतर दि. 25 रोजी इंदापूर येथे ही व्यक्ती तपासण्यासाठी गेली असता स्वॅबचा तपासणी अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बावडा परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान,गणेशवाडी येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी सकाळी तातडीने भेट दिली. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव, वैद्यकीय अधिकारी कपिलकुमार वाघमारे यांचेशी बैठकीत ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही, मात्र प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी केले.यावेळी अशोक घोगरे, उदयसिंह पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या