शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घ्या -हर्षवर्धन पाटील ,तलावात पाणी सोडण्यास प्रारंभ
इंदापूर तालुक्यातील शेटफळ-हवेली तलावात नीरा डावा कालव्यामधून शुक्रवार (दि.26) सायंकाळ पासून पाणी सोडण्यात येत आहे.सध्या तलावामध्ये सुमारे 20 टक्के पाणीसाठा आहे.शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरल्याशिवाय तलावात सध्या सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात येऊ नये,अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याकडे केली आहे.
ब्रिटिशकालीन असलेल्या शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता 620 द.ल.घनफूट आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, वरच्या बाजूस असलेल्या फलटण, बारामती आदी भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे, त्यामुळे तेथील पिकांना पाण्याची गरज नाही.सध्या तलावात नीरा डावा कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा सुमारे 175 ते 180 क्यूसेक्स क्षमतेचा आहे.त्यामध्ये तातडीने वाढ करावी,अशी सूचना हर्षवर्धन पाटील यांनी अधीक्षक अभियंता धोडपकर यांच्याशी चर्चा करताना केली आहे.शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येईल,अशी ग्वाही अधिक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शेटफळ-हवेली तलावाच्या लाभ क्षेत्रामध्ये भोडणी, वकिलवस्ती,बावडा, सराटी, निरनिमगाव, कचरवाडी(भगतवाडी), शेटफळ , पिठेवाडी, लाखेवाडी या गावांचा समावेश आहे.दरम्यान,शेटफळ तलावामध्ये पाणी सोडून, हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचे मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी गुरुवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती.
टिप्पण्या