इंदापूर :तालुक्यामध्ये शनिवारी (दि.18) रात्री झालेल्या अवकाळी अशा वादळी पावसाने व गारपिटीने फळबागांचे व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त फळबागांचे व शेतीपिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांकडे सोमवारी(दि.20) निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
अचानकपणे वादळी वाऱ्यासह गारपीठ झाल्याने नुकसानाची तीव्रता वाढली आहे.तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी या फळबागांचे तसेच गहू, हरभरा, मका, ऊस तसेच कडवळ, मकवान या चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सध्या राज्यात लॉक डाऊन असल्याने शेती पिकांना भाव नाही व दुधालाही कमी भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. सध्या अशी अडचणीची परिस्थिती असतानाच अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासन पातळीवर प्रयत्न करीत आहेत.तरी इंदापूर तालुक्यात वादळी पावसाने नुकसान झालेल्या फळबागा व शेती पिकांचे आपले कार्यालयामार्फत पचंनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद व कार्यकर्ते उपस्थित होते.
_____________________________
टिप्पण्या