इंदापूर : प्रतिनिधी दि.4/10/25
केंद्र सरकारने इथेनॉलचे आगामी हंगामासाठी 1050 कोटी लि.चे टेंडर काढले आहे. त्यामध्ये तब्बल 650 कोटी लि. इथेनॉल कोटा हा साखर उद्योगासाठी दिलेला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागणीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत साखर उद्योगासाठी 8 टक्क्याने इथेनॉलचा कोटा चालू होणाऱ्या हंगामासाठी वाढविण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे व्यक्त केली.
केंद्र सरकारने आगामी काळामध्ये इथेनॉलचे भाव वाढवणे गरजेचे झाले आहे. इथेनॉलचे भाव वाढल्यात त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. इथेनॉलच्या तसेच साखरेच्या एमएसपीच्या भाववाढीची मागणीही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे, या संदर्भातही केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, सध्या शेतकरी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे. ऊस पिक हे शाश्वत पीक असल्याने व नैसर्गिक आपत्ती तग धरणारे पीक असल्याने देशात व राज्यामध्ये ऊसाच्या लागवड क्षेत्रात पुढील वर्षी निश्चितपणे वाढ होईल, असा आशावाद हर्षवर्धन पाटील व्यक्त केला. आगामी गळीत हंगामामध्ये महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र वाढल्याने देशामध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रभागी राहील, त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य अग्रेसर असेल, असा अंदाजही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
--------------------------------
चालु वर्षी राज्यात 12.50 लाख हेक्टर क्षेत्र उस पिकाखाली आहे. त्यातून साधारणत: 110 ते 115 लाख मे.टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा साधारण 25 ते 30 लाख मे. टनाने जास्त निर्माण होणार आहे. तसेच देशामध्ये सुमारे 350 लाख मे. टन साखर उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, इस्मा यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आगामी हंगामामध्ये सुमारे 25 ते 30 लाख मे.टन जादा उत्पादित होणाऱ्या साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
टिप्पण्या