पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे "जागतिक दर्जाचे स्मारक" उभारावे, ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी मौजे चौंडी ( ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे "जागतिक दर्जाचे स्मारक" उभा करावे, त्यासाठी चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित विभागास ५०० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करून मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती राज्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री भरणे यांनी दिनांक २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले.
या निवेदनात मंत्री भरणे यांनी म्हटले आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष सध्या साजरे होत असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व योगदानाचा समयोचित गौरव करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म मौजे चौंडी ( ता. जामखेड, जि. अहिल्यानगर ) येथे झाला. धनगर समाजाच्या महान परंपरेतील त्या एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होत्या. शासनाच्या वतीने त्यांच्या स्मृतींचा जागर व्हावा, हा आमचा समाज म्हणून प्रामाणिक आग्रह आहे.
धनगर समाज ही हजारो वर्षापासून या देशात अस्तित्वात असलेली एक सशक्त, श्रमशील व संस्कृतीने समृद्ध अशी जमात आहे. शेती, पशु पालन, लोकजीवनातील योगदाना बरोबरच अनेक समाजसुधारक, योध्दे, संत, गायक, कलाकार या समाजातून उदयास आले आहेत. धनगर संस्कृतीचे वैभव, पोशाख, वेशभूषा, बोलीभाषा, लोककला, संगीत, धार्मिक परंपरा आणि जीवनपद्धती यामध्ये स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. त्यामुळे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली जीवनपट व धनगर समाजाची परंपरा, इतिहास, संस्कृती आणि जीवनशैली आगामी पिढ्यांना पोहोचविण्या करिता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या "बंजारा विरासत" स्मारकाच्या धर्तीवर, " मौजे चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक" उभारण्याची समस्त धनगर समाजाच्या वतीने मी मागणी करत आहे. हे स्मारक केवळ एक सांस्कृतिक स्मारक न राहता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास, धनगर समाजाच्या परंपरा, जीवनशैली, लोककला, साहित्य, संगीत आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे दस्तावेज जतन करणारे वैभवशाली इतिहासाचे प्रतीक ठरेल. या स्मारकाच्या माध्यमातून आगामी पिढीला आपल्या मूळ परंपरा, संस्कृती व इतिहासाची जाणीव होईल. त्यातून त्यांना पुढील वाटचाली साठी प्रेरणा मिळेल. हे स्मारक सामाजिक सशक्तीकरणासह सांस्कृतिक जागृतीचे कार्यही करेल. त्यामुळे
मौजे चौंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शासनाच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारून या करिता रूपये ५०० कोटी निधीची तरतूद करण्यात येण्या संदर्भातील प्रस्ताव ठेवण्याबाबत संबंधित विभागास आपल्या स्तरावरून सूचना व्हाव्यात, अशी सर्व धनगर समाजाच्या वतीने मंत्री श्री. भरणे यांनी विनंती केली आहे.
टिप्पण्या