दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा करणाऱ्या चोराला नातेपुते पोलीसांनी अटक केली आहे.अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत नातेपुते पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.3 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास वैभव विठ्ठल नष्टे ( रा.माळशिरस जि. सोलापूर )हे त्यांच्या आई माया नष्टे यांना घेऊन स्कुटी ( क्र.एम.एच.४५ ए. व्ही.१२६१) वरून नातेपुते परिसरातील शिंगणापूर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी रस्त्यावरून जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या दोन अज्ञात इसमांनी माया नष्टे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता.
या घटनेची माहिती कळताच नातेपुते पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून या घटनेतील मुख्य आरोपी अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे याला मौजे मेडद ( ता. माळशिरस) येथून शिताफीने अटक केली आहे. सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी सातारा दौंड माळशिरस म्हसवड इंदापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपीच्या ताब्यातुन जवळपास ८८ हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.तर या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस नाईक राकेश लोहार करीत आहेत.
टिप्पण्या