सामान्य शेतकरी कुटुंबातील श्रावणी प्रशांत शिताप हिने डबल नॅशनल मेडल पटकावून उंचावला इंदापूरचा मानसन्मान.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात कुराश खेळाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना इंदापूर येथील
श्रावणी प्रशांत शिताप या झुंजार कन्येने डबल नॅशनल मेडल पटकावून इंदापूर चा मानसन्मान उंचावला आहे. या यशा बद्दल तिचे राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, शहा हेल्थ क्लब चे विश्वस्त भरत शहा, जिजाऊ संस्थेच्या प्रमुख विश्वस्त जयश्री गटकुळ, कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष अंकुश नागर व सचिव शिवाजी साळुंखे, आंतरराष्ट्रीय पंच दत्तात्रय व्यवहारे, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहर अध्यक्ष धरमचंद लोढा, रोटरी क्लबचे जिल्हा प्रतिनिधी वसंतराव मालुंजकर यांनी अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
चौदावी राष्ट्रीय सीनियर कुराश चॅम्पियनशिप स्पर्धा लुधियाना ( पंजाब ) येथे दिनांक २३ ते २५ डिसेंबर रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातून २५ राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्राला इंदापूर येथील श्रावणी प्रशांत शिताप हिने ब्राँझ मेडल मिळवून दिले. त्यानंतर २ ते जानेवारी २०२५ रोजी रायपूर छत्तीसगढ येथे ६८ व्या राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेत तिने सिल्व्हर मेडल मिळवून महाराष्ट्राचे नाव भारत देशामध्ये उंचावून दोन राष्ट्रीय पुरस्कार संपादन केले.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या मुलीने सलग दोन राष्ट्रीय पदक पटकावल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खुल्या गटात पंजाब लुधियाना येथे ब्राँझ (कास्य ) पदक दिनांक २४ डिसेंबर २४ ला तर ४ जानेवारी २०२५ ला ५३ किलो वजन गटात राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेत सिल्व्हर (रजत) मेडल मिळवून तिने इंदापूर तालुक्याचे नाव देशात अभिमानाने उंचावले आहे. श्रावणी प्रशांत शिताप ही इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांची कन्या असून ती इयत्ता सातवी पासून ज्युडो आणि कुराश या खेळांचा सराव गुरुवर्य दत्तात्रय व्यवहारे सर यांचे मार्गदर्शनाखाली करत आहे.
इयत्ता सातवी ते दहावी पर्यंत क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी इथे तिने ज्युदो चे सराव प्रशिक्षण घेतले आहे. आता ती जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ ज्युनिअर कॉलेज कालठण येथे बारावीचे शिक्षण घेत असून साई इन्स्टिट्यूट गोवा येथे तिचे ज्युदो चे प्रशिक्षण चालू आहे. ज्युदो मध्ये पुणे महापौर चषक, जिल्हा, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय खेलो इंडिया सारख्या विविध ज्युदो स्पर्धेत तिने शेकडो पदांची लयलूट केली आहे. इंदापूर ज्युदो कराटे असोसिएशन चे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे सर यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे या खेळाची आवड श्रावणी मध्ये निर्माण झाली. आज देश पातळीवर तिचे नाव झाले आहे.
यासंदर्भात श्रावणी म्हणाली, आई वडील यांचे आशीर्वाद, दत्तात्रय व्यवहारे सर यांचे मार्गदर्शन, जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ ज्युनिअर कॉलेज कालठण संस्थेचे विश्वस्त डॉ. भास्कर गटकुळ सर व त्यांचे सर्व सहकारी यांचे अनमोल सहकार्य, त्यास दिलेली जिद्द, चिकाटी तसेच आत्मविश्वास व मेहनतीची साथ यामुळे मी आतापर्यंत यशस्वी झाले असून मला या पुढील काळात सुवर्ण पदकांची कमाई देश परदेश पातळीवर करायची आहे. त्यामध्ये मी निश्चित यशस्वी होईल असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला.
टिप्पण्या