न्यायालयात वाढत असलेली खटल्यांची संख्या ही न्यायव्यवस्थे वर वाढत्या विश्वासाचे प्रतीक : उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे
इंदापूरात जिल्हा, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे,
इंदापूर, डॉ. संदेश शहा.
न्यायालयात वाढत असलेली खटल्यांची संख्या ही न्याय व्यवस्थेवर वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे. न्याय हा सर्वांसाठी सारखा आहे मात्र यामध्ये आणखी पारदर्शकता व न्याय देण्यामध्ये जलदता येण्यासाठी युवा वकिलांनी जेष्ठ वकिलांकडून या व्यवसायातील तंत्र व मंत्र शिकून घेणे गरजेचे आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी व्यक्त केले.
शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी इंदापूर न्यायालयात जिल्हा, अतिरिक्त सत्रन्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालया च्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यायालयीन शिष्टाचाराप्रमाणे झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र महाजन, गोवा महाराष्ट्र बार कौन्सिलचे हर्षद निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार यशवंत माने, विजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे पुढे म्हणाल्या, पक्षकारांना तारीख पे तारीख असा अनुभव आल्यास कोर्टाची पायरी चढू नये अशी भावना निर्माण होते. त्यामुळे सर्वांच्या मदतीने जलद खटले निकाली काढणे गरजेचे आहे. वकील हा केस चा शिल्पकार असतो. त्यामुळे केस चा जलद निपटारा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपीलात गेलेल्या खटल्यात नवीन विना अनुभवी वकील धडाधड अंगावर येणारे प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यांचे आणि पक्षकारांचे देखील नुकसान होते. त्यामुळे नवीन वकिलां नी जेष्ठ अनुभवी वकिलांकडून शिकणे गरजेचे आहे. शॉर्टकट मारण्याने थोडे दिवस यश मिळेल मात्र एकदा का कोर्टाचा विश्वास तुमच्यावरचा निघून गेला तर तो कधीही भरून येणार नाही. पक्षकारांना देखील हे होईलच असे वचन देऊ नका, एखाद्या गरीब पक्षकाराची केस मोफत घेवून पुण्य कमवा असा देखील अनुभवी सल्ला त्यांनी यावेळी दिला. इंदापूर न्यायालयाने कोणतीही आडकाठी न आणता जिल्हा सत्र न्यायालयासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पक्षकारांना वेळीच न्याय मिळण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत या हेतूने काम करत आहे. जुन्नर,शिरूर ला देखील अतिरिक्त सत्र न्यायालय होणार आहे. पुणे जिल्ह्यात १५४ न्यायाधीश असून पैकी ८० न्यायाधीश पुणे शहरात आहेत. इंदापूर ला आवश्यक असणारी सर्व मदत करण्यास तयार आहे. न्यायालय इमारतीसाठी आठ कोटी तसेच सभागृहा साठी चार कोटी रुपये निधीची आवश्यक आहेत. त्यामुळे योग्य प्रस्ताव पाठवल्यास येणाऱ्या अर्थसंकल्पात तो मंजूर केला जाईल. जिल्हा नियोजन मंडळातून वकिलांसाठी शेड उभारणीसाठी वीस लाख रुपयांचा निधी देखील मंजूर केला जाईल. राज्यात न्यायालया संदर्भात काही सुविधांची आवश्यकता असल्यास विधी सचिव यांच्या कडून प्रस्ताव आल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर न्यायालयाच्या इतिहासात आज सर्वात आनंदाचा क्षण आहे. सन २०१४ ला आमदार झाल्यानंतर वकील संघटनेने इमारतीची मागणी केल्यानंतर १९ कोटी रुपये इमारतीला मंजूर केले. कोरोना काळात देखील अजित पवार यांनी निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे इंदापूर शहराच्या वैभवात भर पडेल अशी सुसज्ज न्यायालय इमारत झाली. पूर्वी वकील, पक्षकारांना बारामती, पुण्याला जावे लागत होते मात्र आता त्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. इंदापूर वकील संघटनेने ज्या मागण्या केल्या आहेत, त्या प्राधान्याने सोडवल्या जातील.
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी आमदार विजय मोरे व यशवंत माने हे न्यायालयीन शिष्टाचाराचे पालन करत व्यासपीठाच्या समोर प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी अजित पवार यांची स्पष्टोक्ती सर्वांना हसविणारी ठरली. न्यायालय प्रांगणात लावण्यात आलेल्या विविध झाडावरून त्यांनी मुक्त फटकेबाजी केली. न्यायालयाने परवानगी दिल्यास न्यायालय प्रांगणात डेरेदार झाडे लावण्या साठी यातील तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले जातील असे म्हणत त्यांनी आपले सर्व बाबींकडे लक्ष असल्याचे दाखवून दिले ! यावेळी इंदापूर वकील संघटनेच्या बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीचे कौतुक करत अजित पवार यांनी इथून पुढे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे सूतोवाच केले.
प्रास्ताविक वकील संघटनेचे अध्यक्ष विधीज्ञ गिरीश शहा यांनी केले. सुत्रसंचलन दिवाणी न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधीश श्री. वानखेडे साहेब तर आभार प्रदर्शन नूतन जिल्हा न्यायाधीश श्री. मुधोळकर साहेब यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंदापूर वकील संघटनेने महत्वपूर्ण प्रयत्न केले.
फोटो:- इंदापूर येथे विविध न्यायालयाचे उद्घाटन करताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष विधीज्ञ गिरीश शहा व इतर मान्यवर.
टिप्पण्या