*उद्योजकता विकसित करण्यासाठी डिजिटल मीडिया आणि फ्रीलान्सिंग महत्त्वाचे : आयकॉन पुरस्कार विजेते मास्टर समर्थ भोईटे यांचे प्रतिपादन*
इंदापूर, डॉ. संदेश शहा. जागतिक स्पर्धेच्या युगात सर्वाधिक युवापिढी आपल्या देशात असून युवापिढी ने आपले कौशल्य सिद्ध करून उद्योजकता विकसित करण्यासाठी डिजिटल मीडिया आणि फ्रीलान्सिंग महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन आयकॉन पुरस्कार विजेते मास्टर समर्थ भोईटे यांनी केले. उद्योजकता विकसित करण्यासाठी उद्योजकतेचे मार्ग या विषयावर इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये युवापिढीस मार्गदर्शन करताना बारामती आयकॉन पुरस्कार विजेते मास्टर समर्थ भोईटे बोलत होते. यावेळी यशस्वी फ्रीलांसर असलेले मास्टर समर्थ भोईटे यांनी त्यांचा यशस्वी जीवन प्रवास उलगडला. वयाच्या १७ व्या वर्षांपासून तीन कंपन्यांद्वारे त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला, त्याची उभारणी केली. आपल्या यशस्वी व्यवसायाचे त्यांनी तपशीलवार वर्णन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यावेळी त्यांनी स्वतःचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी वैयक्तिक कौशल्यांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. असंख्य उदाहरणांद्वारे त्यांनी उद्योजकता आणि व्यवसाय वाढीच्या दिशेने फ्रीलांसिंग कसे महत्त्वाचे पाऊल असू शकते हे स्पष्ट केले. याव्यतिरिक्त समर्थ यांनी प्रभावी सोशल मीडिया मार्केटिंगद्वारे व्यवसाय सुरू करण्यात आणि प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल मीडिया कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमादरम्यान, मुलाखत सत्र देखील झाले. यावेळी प्राध्यापक सोनाली काळे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने समर्थ यांना प्रश्न विचारले. समर्थ यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकते कडे धाडसी पावले उचलण्यास प्रोत्साहित केले आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यावहारिक सल्ला दिला.
हा कार्यक्रमाचे संयोजन ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे अधिकारी प्राध्यापक योगेश जाधव यांनी केले. प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या