इंदापूर :तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुणे जि.प.च्या सदस्या व नवी दिल्ली येथील इस्माच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु.अंकिता पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.23) बक्षिसे देण्यात आली. यावेळी झाडांच्या रोपापासून ' अंकिता ' नावाची नामाक्षर कलाकृती आकर्षक पद्धतीने साकारण्यात आली होती.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे त्यात पर्यावरणात झाडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विविध माध्यमातून आपण पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण करून समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे, आपण सर्वांनी वृक्षारोपण करत त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना अंकिता पाटील यांनी केले.
विद्यालयामध्ये अंकिता पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रकला, सुंदर हस्ताक्षर लेखन, निबंध लेखन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंकिता पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने रोपांच्या माध्यमातून साकारलेल्या ' अंकिता ' या शब्दाच्या माध्यमातून अभिष्टचिंतन करण्यात आले.याची संकल्पना फिरोज खतीब व यादव मॅडम व सर्व शिक्षक यांची होती. यावेळी प्राचार्य सी.टी.कोकाटे, प्राचार्य बबनराव लावंड, पर्यवेक्षक जी.जे.जगताप व डी.व्ही. हासे,उपस्थित होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, संचालक उदयसिंह पाटील, सचिव व सरपंच किरण पाटील यांनी अभिनंदन केले.
_______________________________
टिप्पण्या