इंदापूर:प्रतिनिधी दि.20/12/20
केंद्र सरकारने इथेनॉलचे पाच वर्षाचे धोरण जाहीर केले आहे, त्यामुळे देशातील साखर उद्योगाकडून नवीन इथेनॉल प्रकल्प उभारणे तसेच विस्तारीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे केंद्र सरकारचे पर्यावरण प्रमाणपत्र हे कमी कालावधी उपलब्ध व्हावे, त्याकरिता सुलभ प्रक्रिया राबवावी, या मागणी संदर्भात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांची पुणे येथे माजी मंत्री व भारतीय नेते हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.20 ) भेट घेतली.
केंद्रीय मंत्री जावडेकर यांची हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याभेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने इथेनॉलचे अतिशय चांगले धोरण जाहीर केल्याबद्दल मंत्री जावडेकर यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
देशातील डिस्टिलरी प्रकल्पांना सध्या पर्यावरण प्रमाणपत्र काढण्यासाठी सुमारे 15 ते 18 महिने एवढा प्रदीर्घ कालावधी लागतो, सदरची प्रक्रिया विलंबाची आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील अडथळे दूर करून प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी हा 6 ते 7 महिन्यांनी कमी करता येईल, संदर्भातील विविध मुद्द्यांवर भेटीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इथेनॉल धोरणामुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने चालू गळीत हंगामात इथेनॉलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असून,आगामी काळात उत्पादनात भरीव वाढ होणार आहे, त्यामुळे देशाच्या परकीय चलनात मोठी बचत होणार आहे. इथेनॉल प्रकल्पांना चालना देण्यासाठी पर्यावरण प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी कमी करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
____________________________
टिप्पण्या