इंदापूर:प्रतिनिधी दि.7/9/20
इंदापुर तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या 1150 पर्यंत पोहचली असून त्यामध्ये आजपर्यंत दुर्दैवाने झालेले 46 मृत्यू ही चिंतेची बाब आहे. राज्यात मृत्यूचा दर हा केवळ 2.5 ते 3 टक्केच्या आत असताना इंदापूर तालुक्यात मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर 4 टक्के एवढा जास्त का? असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.7) उपस्थित केला.या झालेल्या मृत्यूमध्ये केवळ ऑक्सीजन,व्हेंटीलेटर न मिळाल्याने सुमारे 30 ते 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर हा जास्त असणे म्हणजे येथील लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये अपयश आले आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.चार महिन्यापूर्वी मी इंदापूर तालुका हा कोरोनाचा हॉट स्पॉट होईल, असा जाहीरपणे इशारा दिला होता व त्यानुसार शासनाने ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदी वैद्यकीय सुविधांची उपलब्धता करावी, अशी मागणी केली होती. जर त्यानुसार नियोजन झाले असते तर आज रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली नसती, असे हर्षवर्धन पाटील यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या लोकप्रतिनिधींना परिस्थितीचे गांभीर्य नाही, जबाबदारीची जाणीव नाही, फक्त आश्वासने दिली जातात, असेही त्यांनी सांगितले.
इतर तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत, मंग इंदापूर तालुक्याला मंत्रीपद असूनही चांगल्या वैद्यकीय सुविधा का नाहीत. सध्या इंदापूर तालुक्यातील जनता ही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने भयभीत झाली आहे. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर बेडच्या आरोग्य सुविधा शासनाकडून मिळत नाहीत तसेच बाहेरच्या शहरातही रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही.त्यामुळे भयभीत झालेल्या जनतेला कोण दिलासा देणार? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले,कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूचा दर रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींचे लवकर निदान करणे शक्य होईल व अशा बाधित रुग्णांकडून होणारा संसर्ग रोखला जाईल.तसेच सर्वेक्षणात आढळून आलेल्या बाधित रुग्णांवरती तातडीने उपचार होऊन त्यांचा जीव वाचेल.
इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले मंत्री हे कोविड रुग्णांवरती तातडीने उपचाराचे योग्य व्यवस्थापन करण्यामध्ये निष्क्रिय ठरत आहेत. इंदापूर तालुक्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय साधनांची तसेच डॉक्टर व स्टाफची टंचाई , रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांना होणारा त्रास याकडे कोणाचेच लक्ष नाही. कोविड सेंटरमध्ये अद्यापी अनेक असुविधा आहेत. लोकप्रतिनिधींनी बैठकांमध्ये घोषणा करण्याऐवजी कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यावे. जनतेने सध्या मिळणाऱ्या असुविधांचा मुद्दा कोठे मांडायचा ? आम्ही विरोधासाठी बोलत नाही तर वस्तुस्थिती मांडत आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.जनतेचा शासन, प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही, आता स्वतःचे व कुटुंबाचे कोरोना पासून संरक्षण हे स्वतःलाच करावे लागणार आहे, या मानसिकतेत जनता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाटील पुढे म्हणाले, कमी वेळेत कोरोना बाधितापर्यंत पोहचून त्यांचे विलगीकरण करणेकडे प्रशासकीय यंत्रणेने जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. जनतेने शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून व मास्क, सनीटायझरचा वापर करून कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
________________________________
टिप्पण्या