इंदापूर:भीमा नदीवरील भाटनिमगाव (ता.इंदापूर) कोल्हापूर पध्दतीचा बंधारा हा गेली काही वर्षांपासून नादुरुस्त असल्यामुळे सतत पाण्याअभावी कोरडा पडत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे.तरी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा कायम राहावा,यासाठी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेकडे केली आहे.
सदरची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे आहे. उजनीच्या अगदी पायथ्याशी असलेल्या या बंधाऱ्यातून सध्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे हा बंधारा कोरडा पडला आहे.या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 1 कोटी 75 लाख रू.खर्चाचे अंदाजपत्रक आपल्या कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले आहे,तरी दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात यावी,असे हर्षवर्धन पाटील यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.
सध्या या बंधाऱ्यातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन पाणी वाहून जात असल्याने बंधा-यातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या इंदापूर तालुक्यात बाभुळगाव, भाटनिमगाव, गलांडवाडी नं.2, वडापुरी, अवसरी, सुरवड, भांडगाव, बेडशिंगे आणि माढा तालुक्यातील रांझणी, आलेगाव,रूई या गावांमध्ये चारा व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
सध्या भाटनिमगाव बंधाऱ्यामधील पाण्यावरती शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी तत्वावरील अनेक उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत.परंतु त्या पाण्याअभावी बंद पडल्या आहेत.त्यामुळे या बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
युतीच्या शासनामध्ये बांधलेला बंधारा हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की,युती शासनामध्ये मी मंत्री असताना हा बंधारा बांधण्यात आला. सुमारे 21 वर्षे या बंधाऱ्याला झाल्यामुळे आता या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.मी मंत्रीपदावर असताना भीमा व नीरा नदीवरील बंधारे हे दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून नियोजनपूर्वक बांधले आहेत.त्याचा फायदा गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर तालुक्यातील शेतीला होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केलेआहे
टिप्पण्या