मुख्य सामग्रीवर वगळा

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून)
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.
        ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.
          सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.
          खऱ्या अर्थाने माता सावित्रीने दाखविलेला आत्मविश्वास आज सार्थ झाला. साऊ होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू पाया बनली या जगाचा तुझ्यावर उभी दुनिया सारी. तू शिक्षणासाठी पेटवलेलं रान बघून कर्मठ धरती हादरून गेली. ढाल बनून संयमाची तू अंगावर घेतल्या शेणशिव्या पण आज लेखणी हातात घेऊन तुझ्या लेकी बनल्यात आता वाघिणींच्या छाव्या, मी ही लेखणी हातात घेऊन लडेल तुझा वारसा जपण्यासाठी कारण तू लढलीस स्त्री जातींच्या उद्धारासाठी माझ्या न्याय हक्कासाठी.
         सावित्रीचे काम समजून घ्यायला साऊ समजून घ्यावी लागेल .साऊला समजून घ्यायचं कसं हा जेव्हा मी प्रथम विचार करायला लागले त्यावेळी माझ्या मनात विचार येतो की साऊ शिकली मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्री कोण हे आपल्याला कळेल.
          त्या काळचे वर्णन करताना कवी नामदेव ढसाळ यांची एक कविता मला आठवते. त्यावेळी स्त्री म्हणून जन्माला येणं काय आणि शूद्र म्हणून जन्माला येणं काय एकंदरीत एकच होतं कारण स्त्री ही सवर्णाची असली तरी शूद्रच मानली जायची." मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो ,तुझ्या धर्माला शिव्या देतो ,एवढेच काय मी माझ्या आई-वडिलांनाही शिव्या देतो , बांबलीच्यांनो तुम्ही जन्माला येऊन बरबाद झालात आणि आम्हालाही बरबाद केलात".... म्हणजेच स्त्री जन्म म्हणजेच बरबादी असा जो कालखंड होता त्या कालखंडात साऊने पहिली महिलांची शाळा काढली. सावूच्या अपार कष्टामुळे जिद्दीमुळे स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली आज महिला साक्षर होऊन उच्च पद भूषवत आहेत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उच्चांग गाठला आहे. आज आम्ही नेहमी बाई पण भारी म्हणून मिळवत असतो खरंच साऊ,.. तू ज्योत क्रांतीची, शिक्षणक्षेत्री तुझाच लक्ख प्रकाश ,स्त्री शिक्षण केले सुरू ,सुकर मग झाला आमचा प्रवास. आज मी सुद्धा हाती लेखणी घेऊन लिहीत आहे ही सुद्धा साऊ चीच उतराई. म्हणून पुन्हा म्हणेन साऊ तुझ्यामुळेच जगण्याला अर्थ आला....
        मला कधी कधी प्रश्न पडतो खरंच सावित्रीबाई आपल्या मनामध्ये उतरल्या आहेत का? कारण जितकी आपल्याला सत्यवानाची सावित्री जवळची वाटते तितकी ही सावित्री वाटते का? जून महिन्याची आपण जितक्या आतुरतेने वाट बघतो तितक्या आतुरतेने जानेवारीची वाट बघतो का ?नाही कारण आपल्याला साऊ समजून घेण्यासाठी त्या काळात जावे लागेल. सावित्रीने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली.
          फुले दांपत्यांनी कधीही जात-पात अस्पृश्यता यांना थारा दिला नाही परंतु या काळात सुद्धा आपण महापुरुषांना सुद्धा जातीत वाटतो .मराठ्यांनी वाटून घेतला जिजाऊंच्या शिवरायांना.. दलितांनी कैद केलं रमाईच्या भिमरायांना.. ज्योतिबाला न्यायला गोळा झाले सारे माळी.. आणि इथेच होते महापुरुषांच्या विचारांची होळी. परंतु साव ित्रीच्या मनात जात-पात अशा गोष्टींसाठी इवलीशीही जागा नव्हती. स्वतःच्या घरातील पाण्यातील हौद अस्पृश्यांना खुला करून देण्याची हिंमत, विधवा, परितकत्या स्त्रीला मायेनं जवळ करून धैर्य आणि औदार्य देणारी साऊ होती म्हणूनच आज स्त्रीच्या जगण्याला अर्थ आला ,स्वातंत्र्याचा कानमंत्र मिळाला, ती विचार करू लागली ,आर्थिकदृष्ट्या सबल झाली ,पुरुषांच्या बरोबरीने आजची स्त्री चालू लागली पण तरीही आज अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. अजूनही स्त्रीला मादी समजणाऱ्यांची मानसिकता बदलली नाही. पण मला कधी कधी प्रश्न पडतो की स्त्रीची मानसिकता तरी कुठे बदलली आहे? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तरी आम्हाला कळला आहे का?
          आज कार्पोरेट क्षेत्रात वावरणारी स्त्री मार्गशीर्षातले गुरुवार भक्तीभावाने करते ,हळदीकुंकू करते ,विज्ञान शिकवणारी स्त्री 'मासिक पाळी 'आल्याने गुरुवार केला नाही अशी तक्रार करते, एक प्राध्यापिका आठवड्याचे रंग व ग्रहाप्रमाणे ठरवून त्या त्या वारी विशिष्ट रंगाचे कपडे घालते, तेव्हा आपण कोणत्या काळात आहे हेच कळत नाही.
          आजच्या आधुनिक युगात आजच्या व्यवस्थेला जमले नाही ते काम 19 व्या शतकात फुले दांपत्यांनी केले. दीडशे वर्षांपूर्वी सावित्रीने आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडली, दगड माती, शेण गोळे खाल्ले ,मान अपमान सोसला, तो काय आपण नवऱ्याची सेवा करण्यासाठी ? सत्संगाला जाण्यासाठी? पोथी पुराणे वाचण्यासाठी ?उपास तपास करण्यासाठी ?फक्त चांगल्या साड्या घालण्यासाठी ?पार्लरला जाण्यासाठी का ?हा माझा प्रश्न आहे....
        सावित्रीला समजून घेणे गरजेचे आहे .तिची विचारधारा प्रत्येक घराघरात, मनामनात रुजली पाहिजे .सावित्रीचा जन्म प्रत्येक हृदयात होणे हाच स्त्रीचा भाग्योदय आहे .सावित्री बरोबरच ज्योतिराव सुद्धा प्रत्येक घराघरात जिवंत असणे तितकेच गरजेचे आहे. आज आपल्या प्रत्येक मोकळ्या श्वासावर सावित्रीचे ऋण आहे. आणि या ऋणाची जर खऱ्या अर्थाने उतराई करावयाची असेल तर आपल्यातही बदल हा झालाच पाहिजे आणि आपल्यात आज किंचीतही बदल झाला तरच खऱ्या अर्थाने हीच आपली सावित्रीसाठीची आदरांजली असेल कारण शेवटी साऊ ...तुझ्यामुळेच आमच्या जगण्याला अर्थ आला.
 
("थांबला आज टाहो तुझी या कण्यांचा..... तूच दिला अधिकार सन्मानाने जगण्याचा")
         
पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते